नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करताना विदर्भावर फोकस केला आहे. नागपूरचे प्रदेश सरचिटणीस अतुल लोंढे यांची थेट मुख्य प्रवक्ता तर युवा नेते प्रदेश सरचिटणीस विशाल मुत्तेमवार यांच्यावर सोशल मीडियाची जबाबदारी सोपविली आहे.अमरावतीचे माजी मंत्री, प्रदेश उपाध्यक्ष सुनील देशमुख यांना आघाडी, संघटना, सेलचे प्रमुख करण्यात आले आहे. सहप्रमुख म्हणून नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार, प्रदेश सरचिटणीस अभिजित वंजारी यांना देशमुखांच्या सोबतीला दिले आहे. यवतमाळचे प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांच्याकडे अध्यक्ष आणि व्हीआयपींच्या दौऱ्यांच्या नियोजनाची धुरा सोपवली आहे.प्रदेश कार्यकारिणीतून अनेकांची नावे गळाल्याने राज्यात मोठा असंतोष उफाळून आला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः आपल्या यादीतील काही नावे दिल्लीत बदलण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर अलीकडेच कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. नागपूरमधील अतुल कोटेचा, संजय दुबे, मुजीब पठाण यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला.अनेकांना पदे दिली असली तरी मोजक्याच लोकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नाराजी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतुल लोंढे यांची प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांना मुख्य प्रवक्ता करण्यात आले आहेत. दुसरीकडे सोशल मीडियाचा प्रभार विशाल मुत्तेमवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी विशाल मुत्तेमवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, स्थानिकांमध्ये असंतोष उफाळू नये यासाठी त्यांनी लढण्यास नकार दिला होता. ते दक्षिण नागपूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत. अतुल लोंढे यांचेही स्वारस्य दक्षिणेत अधिक आहे. दक्षिण नागपूरमधून विधानसभेची निवडणूक लढणारे काँग्रेसचे उमेदवार किरण पांडव यांना मात्र उपेक्षित ठेवण्यात आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे आमदार मोहन मते यांना विजयासाठी चांगलेच झुंजविले होते. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत निकाल लांबला होता.