नागपूर ः यवतमाळ जिल्ह्यात मागील 14 महिन्यापांसून कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनामध्ये महामारीला तोंड देण्यासाठी सगळी व्यवस्था लागली असल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील ग्रामीण जनतेची नवीन पीक कर्ज वाटपाची, मागील वर्षाच्या पीक कर्जाचे पुनर्गठन, पीककर्ज माफीच्या तक्रारी व प्रलंबित प्रकरण या विषयावर प्रचंड तक्रारी येत आहेत. त्यामुळे ‘सरकार आपल्या दारी’कार्यक्रम पुन्हा सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.
मागील 6 वर्षांपासून शेतकरी मिशनद्वारा ‘सरकार आपल्या दारी’ व ‘सरकार आपल्या गावात मुक्कामी’हे अफलातून कार्यक्रम सुरु करण्यात आले आहेत. सुरूवातीला या मोहिमेला ग्रामीण भागातील अधिकारी-कर्मचारी थोडीसी आनाकानी वा टाळाटाळ करीत असे, मात्र नंतर 1 वर्षाने ही मोहीम प्रशासन व जनतेचा संवाद कायम करणारी असून यामुळे ग्रामीण जनतेला त्यांच्या समस्या तत्काळ सुटत असल्यामुळे अधिकारी-कर्मचारी पूर्ण जोमाने शामिल होत होते. मात्र, मार्च 2020 नंतर कोरोनाचा प्रकोप व लॉकडाउन निर्बंध यामुळे या अभिनव मोहिमेत खंड पडला होता. आता सरकारने निर्बंध शिथिल केल्यामुळे सूचनांचे पालन करून आता पुन्हा सरकार आपल्या दारी व सरकारचा आपल्या गावात मुक्कामी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या दौर्यात किशोर तिवारी यांच्यासोबत सर्व विभागाचे जिल्हास्तरीय अधिकारी असतील व जनतेच्या समस्या मांडण्यासाठी त्या भागातील लोकप्रतिनिधी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी व समस्यांचे तत्काळ निवारण व्हावे, यासाठी या मोहिमेचे सन्मयक व आदिवासी नेते अंकित नैताम करीत असल्यामुळे नागरिकांनी भेटीपूर्वी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे किशोर तिवारी यांनी कळविले आहे.