दिव्य निर्धार/ प्रतिनिधी
नागपूर : नेहमी चर्चेत असलेली नागपूर महानगर पालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये युद्ध सुरू असल्याची चर्चा आहे. महापौराला अधिकारी जुमानत नसल्याची बाब समोर आली आहे. तर विरोधकांनी महोपौरामध्ये दम नसल्याची खिल्ली उडविली आहे. मात्र, यामुळे लोकांच्या समस्यात वाढ झाली आहे.
प्रभाग क्रमांक ३२ मधील मानेवाडा रोड स्थित सिद्धेश्वर सभागृह ते जादूमहल चौकापर्यंत सावित्रीबाई फुले मार्ग सिमेंट रोडचे बांधकाम २०१७ ते २०१८ मध्ये मंजूर झाले होते. तेव्हापासून वर्दळीच्या या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. वेळेकर नगर लेआऊट, सावित्रीबाई फुले नगर, बजरंग नगर, न्यू कैलास नगर, शिवराज नगरचा हा मुख्य रस्ता आहे. तसेच चंद्रमणी नगरातून जाणारा हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावर वंजारी नगर पाण्याच्या टाकीमधून पाणी भरून निघणारे मोठमोठे टँकर चालतात व मेडिकल, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकाही धावतात. तसेच या रस्त्यावर चार दवाखाने आणि अनेक किरकोळ दुकाने आहेत. परंतु, हा अतिशय रहदारी असलेला रस्ता गेल्या दीड ते दोन वर्षांपासून अपूर्ण आहे. कंत्राटदाराने या रोडचे बांधकाम अध्र्यातच सोडून जादूमहल चौक ते राजकमल चौक या नवीन रस्त्याचे काम सुरू केले व तेही अर्धवट ठेवले. या अध्र्या बांधकामामुळे या रोडवर नेहमी अपघात होत असतात. एका अपघातात चंद्रमणी नगरचा एक तरुण मुलगा दगावला. यापुढेही बळी जाण्याची भीती लोकांमध्ये आहे.
कंत्राटदार, काही लोकप्रतिनिधी आणि उच्च पदावर बसलेले अधिकारी कोटय़वधी रुपयांच्या या सिमेंट रस्त्याबद्दल वेळकाढूपणा करीत आहे. आता काही दिवसातच पावसाळा सुरू होईल. पावसात या रोडवर गुडघाभर पाणी साचते. त्यात जर हे असेच अपूर्ण काम राहिले तर लोकांना अतिशय विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागेल, असे सावित्रीबाई फुले नगर नागरिक समितीचे अध्यक्ष प्रीतम खडतकर आणि बसपाचे प्रदेश सचिव उत्तम शेवडे म्हणाले. महापालिका सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील छुप्या युद्धामुळे सिमेंट रस्त्यांची कामे अनेक ठिकाणी अवर्धट सोडून देण्यात आली आहेत. हे अर्धवट रस्ते पावसाळ्यात रहदारीसाठी डोकेदुखी ठरणार आहेत.