राजकीय प्रतिनिधी/ दिव्य निर्धार
नागपूर : जिल्हा परिषदेची निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपने माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल निधान यांचा पत्ता कट केला तर कॉंग्रेसने गोधनीतून ज्योती राऊत यांना तिकीट नाकारली आहे. तर अनेक इच्छूक असताना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर इतर पक्षांतही हवसे-नवसे सुद्धा निवडणुकीच्या तयारी असून उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरांची संख्या अधिक दिसेल, यात शंका नाही.
जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांकडून नामांकन अर्ज दाखल केले. मात्र, भाजपने माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान तर कॉंग्रेसने ज्योती राऊत यांना उमेदवारी नाकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कॉंग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एक नवीन चेहरा दिला. विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी मागील वेळी विजयी झालेल्या सदस्यांनाच उमेदवारी दिली.
माजी विरोधी पक्ष नेते अनिल निधान गुमथळा सर्कलमधून विजयी झाले होते. यंदाही त्यांचाच उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. परंतु, ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारत योगेश डाफ यांना उमेदवारी देण्यात आली. ते माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच निधान यांचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा आहे. निधान यांनी मात्र लढण्यास इच्छुक नसून दुसऱ्यास संधी देण्यासाठी उमेदवारी नाकारल्याचे स्पष्ट केले. तर गोधनी रेल्वे सर्कलमधून कॉंग्रेसच्या माजी सदस्या ज्योती राऊत यांच्याऐवजी कुंदा राऊत यांना उमेदवारी देण्यात आली. माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या पत्नी सुमित्रा तर चंद्रशेखर कोल्हे यांच्या पत्नी शारदा यांना उमेदवारी देण्यात आली.
सर्वच पक्षात बंडखोरी
कॉंग्रेस, राष्ट्रवादी,भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. राजोला जिल्हा परिषद सर्कलमधून भागेश्वर फेंडर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. फेंडर यांच्या पत्नी मांडळ सर्कलमधून राष्ट्रवादीच्या सदस्या आहेत. राजोलाची जागा कॉंग्रेसला असून अरुण हटवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुमथळ्यात कॉंग्रेसचे वाघ यांनी बंडखोरी करीत दिनेश ढोले यांच्या विरोधात अर्ज दाखल केला. तर येणवामध्ये राष्ट्रवादीचे नेते नीलेश धोटे यांनी भाजपची कमळ घेत आघाडीचे उमेदवार समीर उमप यांच्या विरोधात दंड थोपटले. सावरगाव येथे राष्ट्रवादीकडून बंडखोरी करीत शिंदे यांनी अर्ज दाखल केला. तर भाजपच्या ललिता खोडे यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला.
बहुतांशी ठिकाणी नवीन चेहरा
भाजपने या १६ पैकी ११ ठिकाणी उमेदवार बदले आहेत. काही ठिकाणी पतीच्या जागी पत्नीला तर कुठे पत्नीच्या जागी पतीला तर बहुतांश ठिकाणी नव्या चेहऱ्यांनाच संधी देण्यात आली आहे. भाजपकडून येनवा सर्कलमध्ये नीलेश धोटे , वाकोडी येथून आयुषी धपके, केळवद मधून संगिता मुलमुले, करंभाड प्रभा कडू, बोथीया पालोरा लक्ष्मनराव केने, अरोली सदानंद निमकर, गोधनी रेल्वे येथून विजय राऊत, भिष्णूर नितीन धोटे, पारडसिंगा येथून काटोलचे माजी पं.स.सभापती संदीप सरोदे यांच्या पत्नी मिनाक्षी सरोदे, डिगडोहमधून राकॉंतून भाजपमध्ये आलेल्या सुचीता ठाकरे व गुमथळा सर्कलमधून योगेश डाफ या नवीन चेहऱ्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.