
दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः वानाडोंगरी परिसरात गेली दीड–दोन दशके सातत्याने, निष्ठेने आणि विकासाभिमुख दृष्टीकोनातून कार्य करणारे नाव म्हणजे सौ. महानंदा केशवराव पाटील. सामाजिक बांधिलकी, पक्षनिष्ठा आणि लोकसेवेचा ध्यास हे त्यांच्या कार्याचे अधिष्ठान. ग्रामपंचायत सदस्य ते नगरसेविका असा प्रवास करताना त्यांनी केवळ पदांचा सन्मान राखला नाही, तर प्रत्येक पदावरून लोककल्याणाचा दृढ संकल्प साकार केला.
प्रारंभीचा राजकीय प्रवास
सौ. पाटील यांचा राजकीय प्रवास 2002 साली सुरू झाला. अनुसूचित जाती प्रवर्गातून वानाडोंगरी ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक 6 (महाजवाडी) येथून त्या विजयी झाल्या. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामविकासात पहिली पायरी गाठली. पहिल्या कार्यकाळापासूनच जनतेच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे हा त्यांचा दृष्टिकोन राहिला.
सरपंचपदाचा कार्यकाळ : विकासाचा पाया मजबूत
2013 ते 2016 दरम्यान सरपंच पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी वानाडोंगरीच्या भविष्यासाठी दूरदृष्टी दाखवली. सुमारे अडीच वर्षांच्या कार्यकाळात पायाभूत सुविधांची उभारणी, ग्रामस्वच्छता, नागरी सुविधा आणि गावाच्या सर्वांगीण विकासाचा पाया अधिक मजबूत केला.
या काळातच वानाडोंगरीला नगरपरिषद बनविण्याची मोठी संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. गावाच्या भावी विकासासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल हे ओळखून त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा देत नगरपरिषदेच्या स्थापनेसाठी मार्ग मोकळा केला. याच काळात आमदार श्री. समीर मेघे यांच्या नेतृत्वाखाली त्या भारतीय जनता पक्षात दाखल झाल्या आणि भाजपच्या संघटनात्मक कामाचा भाग बनल्या. पक्षाच्या विश्वासाला कायम न्याय देत त्यांनी वानाडोंगरीत आमदार साहेबांना प्रचंड मताधिक्याचा विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
नगरसेविका म्हणून उल्लेखनीय कामगिरी
2018 मध्ये नगरपरिषद वानाडोंगरीत प्रभाग क्रमांक 10 मधून खुल्या प्रवर्गातून त्या विजयी झाल्या. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 7, 8 आणि 12 च्या विकासाची जबाबदारी त्यांनी हाती घेतली. या संपूर्ण प्रभागात सुमारे 100 कोटी रुपयांची विकासकामे घडवून आणण्याचा विक्रम त्यांनी केला. दर्जेदार रस्ते, सांडपाणी नाले, पिण्याच्या पाण्याची सोय, समाजमंदिर, वाचनालय, क्रीडा सुविधा— अशा विविध कामांमुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलला. प्रशासनाशी समन्वय, लोकसहभाग आणि निधीची प्रभावी मॅनेजमेंट यामुळे त्यांचे नाव एक सक्षम नगरसेविका म्हणून लोकप्रिय झाले.
सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उपक्रम
सामाजिक सौहार्द जपणे हे त्यांचे प्रमुख ध्येय. बुद्ध जयंती, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसारख्या थोर नेत्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचे काम त्यांनी सातत्याने केले.
बचत गटांना प्रोत्साहन देऊन महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा पाया त्यांनी बळकट केला. अंगणवाडीतील पोषण योजना, महिलांचे आरोग्य तपासणी शिबिरे, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना शासन योजनांची माहिती देणे — या सर्व उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला.
गाव विकासातील ठोस योगदान
गावातील मूलभूत सुविधांचा प्रश्न त्यांनी नेहमीच गांभीर्याने हाताळला. पिण्याचे पाणी, रस्ते, नाले, वाचनालय, समाजमंदिर अशा सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देत नियोजनबद्ध विकास साधला. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, असंघटित कामगार योजना यांसारख्या योजनांचे लाभ प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या स्वतः अर्जभरतीपासून कागदपत्रे तयार करण्यापर्यंत मदत करतात — हीच त्यांची लोकाभिमुख कार्यशैली.
कोरोना काळातील निस्वार्थ योगदान
कोरोना काळातील अडचणींमध्ये नागरिकांना आधार देणे ही खरी लोकसेवा. स्वतःच्या पुढाकाराने आणि आमदार साहेबांच्या सहकार्याने त्यांनी अन्नधान्य किटचे वितरण केले. शालिनीताई मेघे हॉस्पिटलमार्फत बाधित रुग्णांच्या उपचारात मदत करून अनेक कुटुंबांना दिलासा दिला. परिसरातील स्वच्छता आणि जनजागृती मोहिमा राबवून सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.
युवा व क्रीडा विकास
युवकांना समाजकार्यात सहभागी करण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील राहिल्या. डे अँड नाईट क्रिकेट टूर्नामेंट, कबड्डी स्पर्धा आणि मुलींसाठी गरबा महोत्सव अशा उपक्रमांतून युवकांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळाले.
भविष्यातील विकास आराखडा
सौ. पाटील यांच्या भावी नियोजनात पिण्याचे पाणी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण, अभ्यासिका केंद्र, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सुंदर बगीचा, वाचनालय सुधारणा आणि महिलांसाठी आरोग्य शिबिरे – अशा महत्त्वाच्या योजना आहेत. लोकसहभागातून आणि जबाबदार प्रशासनाच्या मदतीने वानाडोंगरीला एक आदर्श नागरी प्रभाग बनवणे हे त्यांचे स्वप्न आहे.

