दिव्य निर्धार वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः राज्यातील बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट करून त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यासाठी सरकारने काही राजकीय, सामाजिक संघटनांना हाताशी धरल्याचे दिसून येत आहे. बार्टीच्या व्यवस्थापनातील घाण स्वच्छ करण्यात येत असताना फक्त काही जातींच्या लोकांना खूष करण्यासाठी सरकारच राजकीय व सामाजिक संघटनांना सुपारी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. राज्य सरकारने बार्टीचे महासंचाल धम्मज्योती गजभिये यांना पूर्वपदावर नियुक्त न केल्यात राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. शुक्रवारी(ता.27) ला नागपुरातील संविधान चौकात बार्टी बचाव आंदोलन करून महासंचालक पदावर घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना बेकायदेशीरपणे पदमुक्त करण्यावरून राज्यात मोठे रणकंद माजले आहे. जिल्ह्याजिल्ह्यांत याचा निषेध करण्यात येत असून अनेक सामाजिक आणि राजकीय संघटना राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सभा, बैठका आणि निषेध सभा घेण्यात येत आहेत. बार्टीला न्याय देण्याचे काम महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी गेल्या अडीच वर्षात केले आहे. अनेक योजना गावागावांत आणि समाजातील लोकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम सुरू असल्यामुळे काही जातीय संघटनांच्या डोळ्यांत बाबासाहेबांचे विचार खूपत आहेत. त्यामुळेच त्यांनी महासंचालक पदाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. आमच्या समाजावर अन्याय होत असल्याची ओरड करून बाबासाहेबांनी दिलेले आरक्षण घेऊन त्यांच्याच विरोधात घाण ओकण्याचा प्रकार सध्या राज्यात सुरू आहे. समाजाला भरघोस न्याय देऊनही फक्त समाजातील भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठिशी घालण्याचा प्रकार पुणे काही समाजकंटकांनी केला असून यातूनच सरकारवर दबाव आणून महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना पदमुक्त करण्यात आले आहे. सरकारचा निर्णय आंबेडकरी विचाराला न्याय देणारा नाही तर जातीवादाला खतपाणी घालणारा आहे. राज्यसरकार काही अनुसूचित जातीमधील काही समाजाला खूष करण्याचा प्रयत्न करीत आहे. यातूनच समाजातील चांगल्या अधिकाऱ्यांचा बळी देण्यात येत आहे. त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांच्याविरोधात घाणेरडे आरोप करून बार्टीतील दलाली सुरू करण्याचा प्रयत्न त्या संघटनांकडून होत आहे. त्यामुळेच महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना बदनाम करण्याचा घाट आहे. निविदा देताना लाच मागून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी दलालांना खेळलेली खेळी आहे. सरकारने दबावापोटी हा निर्णय घेतला असून तो निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा बार्टीचे कार्यालयाला कुलूप ठोकू, असा इशारा राज्याचे शेतकरी व कामगार नेते राजानंद कावळे यांनी केला आहे.
जातीय संघटनांची खेळी यशस्वी होऊ देणार नाही ः राजानंद कावळे
राज्यातील वातावरण सध्या गढूळ झाले आहे. यामुळे आंबेडकरी समाजातील अधिकाऱ्यांना बदमान करून त्यांना पदमुक्त करणयाचे प्रकार राज्यात सुरू झाले आहेत. त्याचा पहिला बळी बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचा घेतला आहे. यानंतरही अनेक अधिकाऱ्यांवर असेच आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा काही अनूसूचित जातीमधील काही जातीय संघटनांनी सुरू केला आहे. याविरोधात आता आंबेडकरी समाज एकसंध होऊन लढा देणार आहे. येणाऱ्या काळात अशा संघटनांना वठणीवर आण्याचे काम समाज करणार आहे, असे महाराष्ट्र राज्याचे कामगार व शेतकरी नेते राजानंद कावळे यांनी केला आहे.