



दिव्य निर्धार वृत्तसेवा
नागपूर ः बाबासाहेब आंबेडकर यांना बौध्द धम्म घ्यायची इच्छा नव्हती आणि हिंदू धर्म सोडायचा नव्हता असे दिशाभूल करणारे वक्तव्य करून बौद्ध समाजातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले करीत असून त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे कामगार व शेतकरी नेते राजानंद कावळे यांनी सांगितले. सध्या बौद्ध धम्मावर टीकाटिप्पणी आणि समाजातील लोकांची दिशाभूल करण्याचा धंदा समाजातील नेत्यांनी उचलला आहे. राजकारणात कोणत्याही पक्षात असला तरी आंबेडकरी विचारधारेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहनही राजानंद कावळे यांनी केले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडायचा नव्हता आणि बौद्धधम्म स्वीकारायचा नव्हता, असे सांगितले होते. आठवलेचा हा प्रकार बाबासाहेब अनुयायांमध्ये संताप व्यक्त करणारा आहे. भाजपासोबत हात मिळवणी करून सत्ता भोगण्यास हरकत नाही. मात्र, राजकारणात धम्माचा समावेश करण्याचा प्रयत्न आठवलेकडून होत आहे. यामुळे समाजात दुफडी निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराधेलाच संपविण्याचा प्रकार आता रिपब्लिकन नेत्यांकडून होत असल्याचा आरोपही राजानंद कावळे यांनी केला आहे. रामदास आठवले यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि समाजाची माफी मागावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही राजानंद कावळे यांनी दिला आहे.