दिव्यनिर्धार/ प्रतिनिधी
अमरावती : पौराणिक स्थळी, तसेच संस्थांकडे दुर्मिळ हस्तलिखीत पोथ्या उपलब्ध आहेत. अनेक पोथ्यांचा लेखनकाल पौराणिक आहे. हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी त्यांचे डिजीटलायझेशन होणे आवश्यक आहे. विविध तज्ज्ञांची मदत घेऊन हस्तलिखितांच्या डिजीटलायझेशनचे काम पूर्ण करावे जेणेकरून हा ठेवा जतन होईल व अभ्यासकांसाठी उपलब्ध राहील, असे पालकमंत्री यावेळी म्हणाल्या.
श्री क्षेत्र रिद्धपूर विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखड्यानुसार कामे पूर्ण करतानाच पर्यटनस्थळावरील स्थानिक बाबींचा समग्र विचार करून पर्यटनवाढीच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्या, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री अॅिड. यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी दिले.
पर्यटन विकास महामंडळाची ऑनलाईन बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. वरुड- मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, पर्यटन विकास महामंडळाचे विवेकानंद काळकर, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, अमरावती जिल्ह्याला मोठा पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याचबरोबरच, निसर्गसौंदर्याने नटलेल्या विविध वनांचा जिल्ह्यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता आहेत. त्या लक्षात घेऊनच प्राचीन वारसा जपणे व उत्कृष्ट पायाभूत सुविधांसह पर्यटनाला चालना देणे यासाठी जेजे स्कूलच्या कलावंतांच्या सहकार्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. विविध ठिकाणी विकास आराखड्यातून कामे होत आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळानेही यासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या पाहिजेत. मोझरी, रिद्धपूर अशा विविध ठिकाणी स्थानिक पातळीवरील वैशिष्ट्ये अधोरेखित करणारे उपक्रम राबवावेत. रिद्धपूर येथील विविध स्थळांचा विकास साधताना तेथील तलावाचेही सौंदर्यीकरण करावे. आराखड्यातील निधीबरोबरच पर्यटन निधीही वापरावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
महानुभावपंथांची काशी असलेले श्री क्षेत्र रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार महानुभावपंथ धर्मगुरू गोविंदप्रभू यांच्या जीवनकार्याची माहिती देण्यासाठी थीम पार्क, तसेच महानुभाव पंथांशी संबंधित विविध स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याचा निर्णय यावेळी झाला. आराखड्यात भक्त निवास, आरोग्य सुविधा अनुषंगाने रुग्णालय, पर्यटन विकास अंतर्गत येणारे उपक्रम, प्रवासी निवारा, रेल्वे स्टेशन संदर्भात पाठपुरावा, रोहयो अंतर्गत येणारे उपक्रम, वृक्षारोपण, शासकीय निवासस्थान, आश्रमशाळा, बौद्ध विहार, विपश्यना केंद्र, ईदगाह, सांस्कृतिक भवन, सभागृह तसेच प्राथमिक सोयी सुविधा यासंदर्भात चर्चा करण्यात आली.