नागपूर ः समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत यावर्षी प्रथमच दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सन २०२०-२१ च्या ५ टक्के अखर्चित निधीतून लाभ देण्यात आलेला आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन कॉग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल घरडे यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिव्यांगाकरिता असलेल्या विविध योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेने सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात खर्च न केलेल्या ५ टक्के अखर्चित निधीतून समाज कल्याण विभागाच्या आढावा सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभजेकर व समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख यांना ही योजना राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार समाज कल्याण सभापती नेमावली माटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विषय समितीच्या सभेत ५२ लाभार्थ्यांची निवड करण्यास मंजुरी देण्यात आली.
दिव्यागांना प्रत्येकी १ लाख ५० हजार देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त रॅम्प, रेलिंग, विशेष लाईट, कमोड इत्यादी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या घरकुलांचे बांधकाम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नागपूर मार्फत राबविण्यात येणार असून शासनाच्या शासन निर्णयातील अटी व शर्ती अनुसार बांधकामाची प्रगती पाहून समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यात पात्र ठरलेल्या दिव्यागांना दीड लाख पंचायत समितीला अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती राहुल घरडे यांनी दिली.
जिल्हा परिषदेने ५ टक्के अखर्चित निधीतून दिव्यांगाकरिता प्रथमच महत्त्वाकांक्षी योजना राबविल्यामुळे दिव्यांगांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले आहे. दिव्यांगांच्या वतीने पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, समाज कल्याण सभापती नेमावली माटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभजेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, समाज कल्याण अधिकारी बाबासाहेब देशमुख व समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आल्याचे राहुल घरडे यांनी सांगितले. दिव्यांगाकरिता महत्त्वाकांक्षी ठरणारी घरकुल योजना कायमस्वरूपी राबविण्याची मागणी नागपूर जिल्हा (ग्रा) काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राहुल घरडे यांनी केली आहे.