नागपूर, ः दरवर्षी जिल्ह्यांतर्गत होणाऱ्या बदल्या यावर्षी होणार नाहीत. शासनाने आदेश काढून बदली प्रक्रिया रद्द केली आहे. यामुळे ग्रामसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे; तर दुसरीकडे कोरोनामध्ये कामाचा व्याप वाढल्याने त्यांच्यावर ताण वाढला आहे. अशा कठीण प्रसंगी शासनाने बदली रद्दचा आदेश काढून ग्रामसेवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केल्याचा आरोप ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत मेश्राम यांनी केला आहे.
राज्यात जून ते जुलै महिन्यात शासकीयस्तरावर बदल्या करण्यात येतात. यात जिल्हास्तरावरील बदल्याचे प्रमाण अधिक असते. शिक्षक, ग्रामसेवक आणि इतर कर्मचाऱ्यांचा यात समावेश होतो. मात्र, सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. ग्रामीणस्तरावर ग्रामसेवकांवर ग्रामीण विकासाच्या जबाबदारीसोबतच आता कोरोना नियत्रंणाची जबाबदारीही आली आहे. गावातील कोरोना रुग्णाच्या घराचे सॅनिटायझर करणे, दिलेल्या वेळेत दुकाने सुरू आहेत किंवा नाही, हे पाहणे तसेच त्यांच्यावर दंड आकारणे, पोलिस अधिकाऱ्यांना मदत करणे, लसीकरणासाठी लोकांना प्रोत्साहित करणे यासह अनेक कामांचा व्याप त्यांच्यावर वाढल्याचे जिल्हाध्यक्ष मेश्राम यांनी सांगितले.
कोरोना काळात ग्रामीण भागातील यंत्रणेत ग्रामसेवकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यावर कामाचा दिवसेंदिवस ताण वाढला आहे. मात्र, शासनाने वार्षिक जिल्ह्यांतर्गत बदल्यांमध्येही हस्तक्षेप करीत त्या रद्द केल्या आहेत. अनेक ग्रामसेवकांना एकाच गावात तीन वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. त्यांना बदलीची अपेक्षा होती; मात्र त्याही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर असून हा बदली रद्दचा आदेश मागे घेण्याची मागणी ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष भारत मेश्राम यांनी केली आहे