उल्हास मेश्राम ः दिव्य निर्धार प्रतिनिधी
साळवा (कुही), ः आवरामारा येथे गावाच्या शेतशिवारात गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे ‘बॅक वॉटर’ मोठ्या प्रमाणात आल्यानेने शेतातील पिके बुडाली असून शेतकऱ्यांची शेतामध्ये जाण्याची रहदारीही बंद झाली आहे. शेतातील उभे पिके बुडून उध्वस्त होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शेतातील पिकांचे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने या स्थितीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आवरामारा परिसरातील शेतकऱ्यांची सद्या झोप उडालेली आहे. कारण आहे गोसेखुर्दचे ‘बॅक वॉटर’. या गावातील शेतकऱ्यांची नदी, नाल्याकाठाशी असलेली शेती शासनाने गोसेखुर्द धरणात संपादित केली. जी शेती संपादित केली नाही, तिथे शेतकऱ्यांनी पिके घ्यायला सुरुवात केली. सदयास्थितीत धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने गोसीखुर्दचे ‘बॅक वाटर’ शेतात शिरले असून गावाच्या रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी आले आहे. त्यामुळे शेतातील पिके पाण्याखाली आलेली आहेत. शेतकऱ्यांच्या येण्या-जाण्याच्या पाणंद रस्त्यावर धरणाचे पाणी आले. त्यामुळे रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे. आता मात्र रब्बी पिकांची पेरणी कशी करावी, असा प्रश्र्न शेतकऱ्यांना पडला आहे.
या विषयीची तक्रार गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंत्याकडे करण्यात आली आहे. पंरतु अजुनही समस्या सुटली नाही. गावातील घराजवळ ‘बॅक वॉटर’ आलेले असून साप, अजगर, मगर यासारख्या हिंस्त्र आणि विषारी प्राणी शेतकऱ्यांच्या बकऱ्या, कोंबड्यांना भक्ष्य करीत आहेत. ही समस्या ताबडतोब सोडवावी अशी मागणी माजी सरपंच शास्री वंजारी, माजी सरपंच प्रभू वैद्य, बळीराम खंडारे, शैलेश धारगावे, अमृत उरकुडे, सचिन गणवीर, इंदुबाई गजभिये यांनी केली आहे.
सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोकादायक वावर
शेतकरी धनसोभन वंजारी, संजय उरकुडे, अरुण आतिलकर यांच्या शेळी, बोकुळ, बकरी आणि कोंबड्यांना साप, अजगर यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांनी खाऊन फस्त केले आहे. सर्व नुकसानग्रस्त कुटुंबांचे व बुडीत पिकांचे पंचनामे करुन शासनाने त्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
गोसेखुर्द धरणाचे पाणी आवरामारा गावापर्यंत शिरले आहे. त्यापासून शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. अगोदरच धरणाची लेवल २४५ मीटरपर्यंत करावयाची होती. ते अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. सद्याची स्थिती अशी आहे की, बॅक वॉटरने पीडित शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्याकरीता शासनाने एक तर यावर उपाययोजना करावी किंवा आवरामारा गावाचे पुनर्वसन करावे. –
राजानंद कावळे, सामाजिक कार्यकर्ते
आवरामारा, राजोला, आमडी, कुजबा, टाकळीची नळयोजना, इंधन विहिरीतील पाणी दूषित झाले आहे. बॅक वॉटरमुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. घरात ओलावा वाढला असून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गावाचे पुनर्वसन करण्यात यावे.
-अरुण हटवार, जि.प.सदस्य